पुणे – बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचदरम्यान अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हवामान ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात हवामान ढगाळ आहे. यामुळे थंडी कमी झाली असून अनेक भागांत किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. राज्यात सर्वात कमी तापमान हे चंद्रपूर याठिकाणी 13.0 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुण्यात ही तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.