पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली
मुंबई (प्रतिनधी) – महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबत अनेक जणांकडून येणा-या तक्रारींची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले.
महापरीक्षा पोर्टलमध्ये असणा-या त्रुटींबाबत अनेक निवदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत.याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर (एसओसी) चे उद्घाटन करण्यात आले. राज्य शासनाच्या “स्टेट डेटा सेंटर’च्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळांवरील डेटा ठेवलेला असतो. हा डेटा तसेच क्लाऊडवरील शासनाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य प्रणालीद्वारे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे सेंटर स्थापन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.