कोरेगाव भीमातील पुणे-नगर रस्त्यावरील कामे “जैसे थे’
शिक्रापूर (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने थैमान घातल्याने पुणे-नगर महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती व नऊशे मीटर लांबीच्या गटाराची कामे सुरु केली; मात्र पाऊस बंद होताच ही कामे ठप्प झाल्याने या अर्धवट कामांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे नुकत्याच झालेल्या पावसाच्या हाहाकारामुळे बांधकाम विभागाच्या कामाची दैना उडाली होती. त्यातच पावसामुळे काम करता येत नसल्याने तब्बल महिनाभर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाची पूर्वतयारी नसल्याने काम करण्याबाबत एकमत नसल्याने दोन महिने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. याबाबत सतत पाठपुराव्यामुळे बांधकाम विभागाला जाग आली व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे तात्पुरते काम हाती घेण्यात आले व रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूने नऊशे मीटर लांबीची भूमिगत गटार योजना करण्याचे काम हाती घेतले होते.
थोडेफार काम सुरुही केले; मात्र या कामातही नियोजन नसल्याने त्यातून पाणी वाहून जात नसल्याने ही कामे बंद पडली आहेत. दरम्यान पाऊस थांबला अन् बांधकाम विभागाने सुरु केलेली कामेही ठप्प पडली आहेत. या अर्धवट कामांमुळे रस्त्याच्या बाजूने खोदलेली गटारांमध्ये पाणी साचून रोगराईही पसरली असून या गटारांमध्ये वाहने वारंवार पडत आहेत. मेन चौकामध्येच मोठा खड्डा असून गटारावरील झाकण टाकण्यावाचून तसाच उघड्या अवस्थेत असल्याने लहान मुलेही या गटारांमध्ये पडत आहेत.
गटारे उघड्या अवस्थेतच असल्याने रात्री अपरात्री अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.