पाबळ येथील कोल्हे कुटुंबीयांचा समाजात आदर्श
शिक्रापूर/पाबळ (वार्ताहर) – सध्या समाजात मुलगी नको, मुलगा हवा अशी स्थिती असताना, पहिली बेटी धनाची पेटी असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते आणि मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे; मात्र शिरूर तालुक्यातील पाबळ येथील कोल्हे कुटुंबाने मुलीच्या जन्माचे स्वागत फुलाच्या पायघड्या टाकत केले असून कोल्हे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाबळ (ता. शिरूर) येथील प्रतिक्षा व ऋषिकेश कोल्हे या दाम्पत्याला पहिलीच मुलगी झाली. प्रतिक्षा कोल्हे यांनी आपल्या माहेरी 25 सप्टेंबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर दोन महिन्यानंतर प्रतिक्षा कोल्हे या सासरी पाबळ येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासह मुलगी शिवन्याचे औक्षण करत ओवाळून फुलांच्या पायघड्या टाकत फुलाच्या वर्षावात स्वागत केले. यावेळी घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून तसेच घरामध्ये मुलींच्या नावाने गाणे लावत या मायलेकींचे स्वागत केले.
मुलगी ही परक्याचे धन असते म्हणून मुलगी नको अशी मानसिकता बहुतांश दाम्पत्यांची झाली आहे; मात्र कोल्हे दाम्पत्याने मुलीचे अनोखे स्वागत केले आहे. मुलीच्या रूपाने घरात लक्ष्मी आली असे म्हणून तिचा गौरव देखील केला. कोल्हे दाम्पत्याने मुलीच्या नावावर एक लाख रुपयांची धनराशी ठेवून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून गोरगरीबांच्या मुलींकरता शैक्षणिक खर्च करण्याचा संकल्प सोडला आहे.
कोल्हे दाम्पत्याचा मुलीसाठी नवस
एकीकडे मुलगा व्हावा यासाठी वेगवेगळे नवस केले जात असताना, कोल्हे कुटुंबीयांनी मुलासाठी नवस न करता चक्क पहिली मुलगी व्हावी यासाठी ग्रामदैवताकडे नवस केला होता. आम्ही मुलीला घरी घेऊन येत असताना कोल्हे कुटुंबीयांनी प्रथम ग्रामदैवताचे दर्शन घेत नवस फेडला आहे.