लवकरच खाते वाटप व विस्तार होईल
नगर – पक्ष अडचणीत असतांना पक्ष सोडून जाण्याची घाई केली. आता ही मंडळी अस्वस्थ आहे. आम्ही फसलो गेलो अशी कबुली देत आहेत. पण त्यांच्या जाण्याने पक्षात रिक्त झालेल्या जागा केव्हाच भरल्या गेल्या. त्यामुळे ज्यांना या जागा मिळाल्या त्यांना विचारावे लागेल. त्यामुळे सध्या तरी त्या मंडळी आहे तेथेच रहावे, सध्या तरी कोणाला कॉंग्रेस पक्षात प्रवेश नाही, असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी नगरला व्यक्त केले.
ना. थोरात आज नगरला आले होते.
येथील पोलीस कवायत मैदानात हेलिकॉप्टरने ना. थोरात आल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मी ऐकत आहे की पक्षातून गेलेले मंडळी पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक आहेत. ही मंडळी अस्वस्थ झाली असून आम्हाला फसवून नेल्याचे सांगत आहेत. ते गेल्यानंतर पक्षात रिक्त राहिलेल्या जागांवर युवकांना संधी मिळाली आहे. त्यामुळे या युवकांबरोबर चर्चा करू कोणाला प्रवेश द्यायचा हे ठरविण्यात येईल. असे सांगून ना. थोरात म्हणाले की, लवकरच मंत्र्यांचे खातेवाटप तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.
हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर अत्यात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आल्या बद्दल ना. थोरात म्हणाले की, पोलिसांनी आरोपींना केलेल्या एन्काऊंटरबाबत मी भाष्य करणार नाही. परंतु अत्याचारांच्या अशा घटनांमध्ये लवकरात लवकर कडक शिक्षा आरोपींना झाली पाहिजे. आपण म्हणतो की, अशा आरोपींना भरचौकात फाशी दिली पाहिजे. त्यापेक्षाही कडक कारवाई होण्यासाठी वेळपडली तर कायदे बदलण्याची गरज आहे. जलदगती न्यायालयात असे खटले दाखल होण्यासाठी जलदगती न्यायालय असे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
नगर जिल्हा परिषदेतील नव्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रियेला अजून वेळ आहे. असे असले तरी या जिल्हा परिषदेत आम्हाला यश मिळणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, ज्येष्ठ नेते डी.एम. कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, संपत म्हस्के, जयंत वाघ, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील आदींनी ना. थोरात यांचे स्वागत केले.
स्वागत पुष्पगुच्छ पडले रस्त्यावर
ना. बाळासाहेब थोरात यांचे नगरमध्ये महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेते व कार्यकर्ते जमा झाले होते. प्रत्येकाने ना. थोरातांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले. एवढ्याचे पुष्पगुच्छ ना. थोरातांनी स्वीकारले. परंतु हे पुष्पगुच्छ नंतर रस्त्यावर फेकून द्यावे लागले.