जामखेड – जामखेड नगरपालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीची मोहीम जोरात सुरू केली असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीकडे असलेल्या 17 लाख रूपये कराची थकबाकी न भरल्याने नगरपालिकेने बाजार समितीच्या कार्यालयास कुलुप ठोकुन सील केले. या कारवाईमुळे बाजार समितीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
जामखेड शहरात नगरपालिकेने प्रशासनाची कर वसुली जोरात चालू आहे. थकितांना लेखी कळवूनही वेळेत दखल न घेतल्याने नगरपालिकेने सक्तीची वसुली चालू केली आहे. नगरपालिका झाल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. बाजार समितीकडे नगरपालिकेची दंडासह 17 लाख 35 हजार 494 रुपये एवढी थकबाकी आहे. याबाबत बाजार समिती ही काही रक्कम देण्यास तयार होती मात्र नगरपालिकेकडुन सर्व रक्कम भरावी, असे सांगण्यात आले होते.
मात्र ही रक्कम भरण्यास बाजार समितीने टाळाटाळ केली. त्यामुळे जामखेड नगरपालिकेने तीन वेळा जप्तीची नोटीस पाठवली होती. मात्र तरी देखील बाजार समितीने रक्कम भरली नाही. त्यामुळे अखेर नगरपपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता सचिव व सभापती कार्यालयासह संपुर्ण कार्यालयास कर थकवल्याप्रकरणी कुलुप ठोकून सील ठोकले. त्यामुळे बाजार समितीच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना अर्धवट कामकाज सोडुन बाहेर पडावे लागले.
याबाबत बाजार समितीचे सचिव लक्ष्मण कांबळे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की बाजार समितीच्या आवारात नगरपालिका कसल्याही सुविधा उपलब्ध करून देत नाही. तसेच साफसफाई कामगार, लाईट व गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे पाणीपट्टीसह एवढा कर आम्ही कसा भरायचा? तसेच जो आम्हाला दंड आकरला आहे. तो आकारु नये जी रितसर कराची रक्कम असेल ती आम्ही भरण्यास तयार आहोत. मात्र आज बाजार समितीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पूर्ण रक्कम भरु शकत नाही.
त्यामुळे दोन लाख रुपयांचा धनादेश उपसभापती शारदा भोरे यांच्याशी चर्चा करून देण्यास तयार होतो. तरी देखील ही रक्कम घेण्यास नगरपालिकेने नकार दिला व आम्हाला नोटीस न देताच कार्यालय सील केले. यावेळी पालिकेचे कार्यालयीन निरिक्षक विष्णू भिसे, कर निरिक्षक रामराव नवगिरे, पी. व्ही नरवडे, शंकर देशमुख, सुग्रीव फुंदे, रज्जाक शेख, अभिजीत भैसडे, प्रमोद टेकाळे, शंकर देशमुख, हितेश वीर, अविनाश साबळे, रामेश्वर नेटके, राजेंद्र गायकवाड, वलीभाई शेख, संजय खेत्रे कर्मचारी उपस्थित होते.