बिबट्याच्या बछड्याचा कोंबड्यांवर हल्ला

भरदुपारी बाराच्या सुमारास घडली घटना

वरवंड – पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्‍यापासून काही अंतरावर असणाऱ्या घराजवळून बिबट्याच्या बछड्याने एक कोंबडा पकडून नेल्याची, तर एका कोंबड्यास जखमी केल्याची घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. भरदुपारी बिबट्याच्या पिल्लाने कोंबड्यांवर हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांत थीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे भेट देऊन बिबट्याच्या पिल्लाच्या ठश्‍यांची पाहणी केली आहे.

याबाबत नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल नाक्‍यापासून जवळच्या अंतरावर, महामार्गानजीकच ग्रामपंचायत सदस्य अरुण भागवत यांचे घर आहे. या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या कोंबड्यांच्या खुराड्यापासून काही अंतरावर फिरणाऱ्या एका कोंबड्यास बिबट्याच्या पिलाने नेले आहे, तर एक कोंबडा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अरुण भागवत यांच्या घराच्यामागे राहणारे राजेंद्र भागवत यांनी पाहिली.

याबाबत राजेंद्र भागवत यांनी सांगितले की, जवळच्या चिकू च्या झाडापासून बिबट्याचे पिल्लू बाहेर आले, त्याने एका कोंबड्यास पकडले आणि तो जवळच्या उसाच्या शेतात गेला. साधारण गुडघ्याएवढ्या उंचीचा हा बछडा आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटस येथील वन विभागाचे कर्मचारी अरुण मदने, बाबासाहेब कोकरे यांनी येऊन भागवत यांच्या घराजवळील भागाची आणि उसाच्या शेताची पाहणी केली.

या शेतात बिबट्यासदृश्‍य प्राण्याचे ठसे आढळून आले. या ठश्‍यांची पाहणी करून फोटो वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतले आहेत. पाटस आणि कुसेगाव (ता. दौंड) येथील परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्याची चाहूल लागल्याने नागरिक भीतीच्या छायेत आहेत. वनविभागाने बिबट्यांसाठी त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.