सुनीता शिंदे
प्रेरणांकित संस्था त्या 11 जणांना देतेय जगण्याची प्रेरणा
कराड – सांगा कसं जगायचं ? कण्हत-कण्हत की गाणं म्हणत? कवीवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणसं या जगात आहेत. मात्र आपल्या आयुष्यात शारीरिक कमतरता असतानाही आनंदी जीवन जगणारी माणसेही आहेत.
कराड येथील प्रेरणांकित जननी सामाजिक व शैक्षणिक संस्थेत ती बघायला मिळतात. त्यांना आनंदी जीवन जगण्याची नवी उमेद व ऊर्जा मिळतेय संस्थेच्या मुख्य प्रवर्तक वर्षा जाधव यांच्याकडून. स्वत: अपंग असतानाही त्यावर मात करत संस्थेतील अकरा मुलांचा त्या आधार बनल्या आहेत. एवढेच नाहीतर हे अकराजणही आता एकमेकांचा आधार बनले आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे व सचिन पिळगावकर यांच्या “एकापेक्षा एक’ या मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत याने बहिरा तर सचिन पिळगावकर याने आंधळ्याची भूमिका साकारली होती. त्या दोघांमध्ये असणाऱ्या व्यंगावर मात करत त्यांनी चित्रपटात एकमेकांना साथ दिल्याचे दाखविण्यात आले होते. अगदी तशीच मदत प्रेरणांकित संस्थेतील ही अकरा मुले एकमेकांना करत आहेत. ज्या मुलाला दिसत नाही त्याला रस्ता दाखवण्याचे काम हाताने अपंग असणारा करतोय, तर ज्याला हात नाही त्याला कामात मदत करण्याचे काम दुसराच करतोय. यामुळे आपल्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव सुद्धा या मुलांमध्ये होत नाही.
दुशेरे ता. कराड येथील वर्षा जाधव या स्वत: पायाने अपंग आहेत. समाजात आपणाला ज्या अडचणी आल्या त्या इतरांना होऊ नयेत त्यांना इतरांप्रमाणे वागवले जावे यासाठी त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन 4 ऑक्टोबर 2018 रोजी कार्वे नाका येथे प्रेरणांकित जननी सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्यांच्यातील उमेद पाहून समाजातील इतरजणही त्यांच्या मदतीला धावले. आज एक वर्षांच्या कालावधीत या संस्थेने मोठा टप्पा पार केलाय.
समाजात असणाऱ्या इतर संस्था या फक्त विशिष्ट अपंगांसाठी काम करतात. मात्र प्रेरणांकित संस्थेने सर्व गटातील अपंगांना आपल्या संस्थेत सामावून घेतले आहे. त्यांच्या राहण्याची, जेवण्याची, शिक्षणाची सर्व जबाबदारी या संस्थेने उचलली आहे. इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतचे असे एकूण अकरा विद्यार्थी येथे घडत आहेत. त्यांना स्वावलंबीत करण्यासाठी वर्षा जाधव यांनी सात ते आठ शिक्षिकांची नेमणूक केली आहे. त्या शिक्षिका मुलांना घडविण्याचे काम करीत आहेत. अगदी पाच महिन्यात स्वत:ची कामे स्वत: करण्याबरोबर एकमेकांना मदत करण्याचे काम करत आहेत. प्रेरणांकित संस्थेच्या वसतिगृहाबाहेर त्यांनी विविध प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत. तसेच शालेय शिक्षणाबरोबरच संगीत शिक्षणाचे धडेही येथे दिले जातात.
अपंग दिनाचे औचित्य साधून संस्थेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्येही त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांनी विविध देशभक्तीपर गाणीही सादर केली. येत्या 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत या मुलांनी मी सावित्री बोलतेय यावर पथनाट्य तयार केले असून ते प्रीतिसंगम परिसरात ते सादर करणार आहेत. तसेच इतर शाळांप्रमाणे क्रीडा स्पर्धांमध्येही सहभागी होण्याचा या मुलांचा मानस आहे. त्यांच्यातील हा उत्साह म्हणजेच प्रेरणांकित संस्थेचे यश म्हणावे लागेल.