देशभरातील सर्व ज्वेलर्सला नोंदणी करावी लागणार
पुणे – सरकारने देशातील दागिने उत्पादकांसाठी जानेवारी 2021 पासून हॉलमार्क बंधनकारक केला आहे. याकरिता पुढील वर्षभर दागिने उत्पादकांना यासाठीच्या आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. दीर्घपल्ल्यात दागिने उत्पादकांसाठी ही बाब चांगली असली तरी लघु पल्ल्यात मात्र दागिने उत्पादकांवर परिणाम संभवतो, असे समजले जाऊ लागले आहे.
सध्या देशात केवळ 800 हॉल मार्किंग केंद्र आहेत. त्यामध्ये आणखी 861 केंद्रांची भर टाकण्यात येणार आहे. देशभरातील सर्व ज्वेलर्सना या केंद्रात नोंदणी करावी लागेल. सध्या देशातील केवळ 28 हजार ज्वेलर्सनी यासाठी नोंदणी केली आहे.
याबाबत हॉलमार्किंग केंद्र संघटनेच्या दक्षता समितीचे अध्यक्ष संतोष साळुंखे म्हणाले, अगोदरच नोटाबंदी आणि जीएसटीमुळे दागिने विक्री कमी झाली असताना या नव्या बंधनकारक नियमामुळे लघु पल्ल्यात विक्रीवर आणखी परिणाम होऊ शकतो.
हॉलमार्किंग केंद्राच्या संघटनेचे अध्यक्ष उदय शिंदे म्हणाले, त्यामुळे या क्षेत्रातील संदिग्धता दूर होईल. देशात आणि परदेशात भारतातील दागिन्यांबद्दल विश्वासाचे आणि पारदर्शकतेचे वातावरण निर्माण होईल. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड कायद्यानुसार उत्पादकांना 14, 18 आणि 22 कॅरेटचे दागिने उपलब्ध करावे लागतील. या दागिन्यांची शुद्धता यामुळे स्पष्ट होईल व खरेदी आणि विक्री करताना ग्राहकांना व उत्पादकांनाही त्रास होणार नाही. अशीच भावना व्यक्त करताना जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले की, यामुळे दीर्घ पल्ल्यात दागिने उद्योग आणि ग्राहकांचे हित साध्य होणार आहे.
तयारी आणि वातावरण निर्मितीसाठी एक वर्षाचा पुरेसा कालावधी सरकारने दिला आहे. एप्रिल 2000 पासून भारतात हॉलमार्कींग उपलब्ध आहे. देशातील 40 टक्के ज्वेलर्स याचा उपयोग करतात. छोट्या शहरातील ज्वेलर्सना आता एक वर्षानंतर हॉलमार्कींग आवश्यक झाले आहे. सध्या केवळ मोठ्या शहरांमध्ये हॉलमार्कींग सेंटर आहेत. छोट्या शहरातही असे सेंटर उभारले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
23 कॅरेटचा टप्पा असावा
या घटनाक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अष्टेकर ब्रदर्सचे संचालक नितीन अष्टेकर यांनी सांगितले की, पुण्यात 90 टक्के ज्वेलर्सकडे हॉलमार्कचे दागिने आहेत. आम्हीही सन 2000 पासून हॉलमार्कचे दागिने उपलब्ध करीत आहोत. सर्वांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, महाराष्ट्रात 23 व साडेतेवीस कॅरेटचे दागिने घेतले जातात. त्यासाठी हॉल मार्कमध्ये 23 कॅरेटचा एक टप्पा उपलब्ध करण्याची गरज आहे. पुण्यातील ज्वेलर्स तसे निवेदन सरकारला देणार आहोत.