कोल्हापूर: कोल्हापूरात जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. जिवबा नाना पार्क इथल्या हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्रीची आहे. या हल्ल्यात सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित देसाई जखमी झाले.करवीर पोलिसांनी याप्रकरणी अविनाश शंकर गवळी, विजय विलास पाटील, अभिजित शीतलकुमार जिरगे या संशयितांना अटक केली.
कोल्हापूर शहरा लगतं असणाऱ्या जीवबा नाना पार्क येथील हॉटेल ऑन द रॉक्समध्ये एका बांधकाम व्यावसायिकांशी संबधित नऊ जण पार्टीसाठी आले होते. काही वेळानंतर त्यातील काही जणांनी दंगा करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत गेल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी याबाबत करवीर पोलिस ठाण्याला कळवले. त्यानंतर फौजदार दत्तात्रय शिंदे आणि हेड कॉन्स्टेबल रणजित देसाई हे पोलिस कर्मचारी पावणेअकराच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टोळक्याला हटवण्यास सुरुवात केली. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेले तरुण पोलिसांच्या अंगावर धाऊन आले. त्यांनी शिविगाळ करत ‘तुमच्या अंगावरील वर्दी उतरवीन, बदली करीन’ अशी धमकी द्यायला सुरुवात केली.
अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत अविनाश गवळी, विजय पाटील, अभिजित जिरगे यांना ताब्यात घेत असताना अन्य तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना केलेल्या मारहाणीत त्यांचे कपडे फाटले. झटापटीत पोलिस कर्मचारी देसाई यांच्या बोटांना दुखापत झाली. पोलिसांनी खाक्या दाखवून तीन संशयितांना ताब्यात घेतले तर अन्य तिघे पळून गेले. सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल तिघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.