नोंदणी बुक, वाहन परवाना परत येण्याचे प्रमाण वाढले

चुकीचे पत्ते की पोस्टाचा हलगर्जीपणा; वाहनमालक वैतागले

– विष्णू सानप

पिंपरी – वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे नोंदणी बुक (आरसी कार्ड) नव्या नियमानुसार पोस्टाद्वारे वाहन मालकांना पाठविण्यात येते. तसेच वाहन परवानाही पोस्टाद्वारेच पाठविला जातो. राहत्या पत्त्यावर संबंधित व्यक्ती मिळून येत नसल्यामुळे महिन्याला हजारो नोंदणी बुक परत येत नसल्यामुळे आरटीओ कार्यालयासमोर नविन प्रश्‍न उभारला आहे. तर योग्य पत्ता दिल्यानंतरही हे बुक मिळत नसल्याने वाहन मालक हैराण झाले आहेत. या प्रकारामध्ये चुकीचा पत्ता की पोस्टाचा हलगर्जीपणा याबाबत वेगवेगळी मतप्रवाह निर्माण झाले आहेत. मात्र या प्रकारामुळे वाहन मालकांना आरटीओ कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.

नवीन वाहन खरेदी केल्यावर वाहन मालकीचा महत्वाचा दस्तावेज असलेले वाहन नोंदणी बुक हे वाहन मालकांनी दिलेल्या पत्यावर पोस्टाद्वारे पाठविले जाते. तसेच नव्याने काढण्यात आलेला शिकाऊ व पक्का वाहन परवानाही पोस्टाद्वारे संबंधितांना पाठविण्यात येतो. मात्र, बऱ्याच वेळा पत्त्ता चुकीचा असल्याने किंवा टपाल कर्मचारी पत्यावर गेल्यावर दस्तावेज घेण्यासाठी कोणीही व्यक्ती उपलब्ध नसल्यामुळे वाहन परवाना व नोंदणी बुक परत आरटीओ कार्यालयात मोठ्या संख्येंने येत आहेत. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून दर महिन्याला सुमारे 20 हजार वाहन नोंदणी बुक व वाहन परवाने संबंधितांना पाठविले जातात. मात्र, चुकीचा पत्ता किंवा संबधित वाहनमालक उपलब्ध नसल्याने तब्बल 5 हजार परवाने व नोंदणी बुक पुन्हा आरटीओ कार्यालयाकडे परत येत असल्याचे दरमहाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात दिवसाला नवीन वाहने व जुन्या वाहनांचे हस्तांतर तसेच नविन वाहन परवाना काढण्यासाठी किमान एक हजार नागरिक येतात. त्यापैकी सातशेहून अधिक नागरिकांचा वाहन परवाना व वाहन नोंदणीची प्रक्रिया दर दिवशी पूर्ण होत आहे. यानंतर संबंधित व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर हे दस्तावेज टपालाद्वारे पाठविले जातात. यातील सुमारे 25 टक्‍क्‍यांहून अधिक म्हणजेच महिन्याला पाच हजारांहून अधिक दस्तावेज परत आरटीओकडे येत आहेत. माघारी आलेले दस्तावेज घेऊन जाण्यासाठी वाहनचालकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. शिवाय पन्नास रुपयांचे शुल्कही आकारले जात आहे. त्यामुळे एका बाजूला मानसिक दुसऱ्या बाजुला आर्थिक मनस्ताप या वाहन मालक तसेच वाहन परवानाधारकांना पडत असल्यामुळे त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.

पूर्वीप्रमाणे सुविधा द्या
आरटीओ कार्यालया वाहन नोंदणी अथवा वाहन परवान्यासाठी देण्यात येणारे पत्ते योग्य असले तरी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, संबंधित कागदपत्रे पोहोचविण्यासाठी नसलेले गांभिर्य आणि आरटीओ कार्यालयातील मनमानी गोंधळ याचा परिणाम वाहन मालक व परवाना धारकांवर होत असल्याचा आरोप संबंधित करत आहेत. पुर्वीप्रमाणेच वाहन नोंदणी बुक अथवा वाहन परवाना तयार झाल्यानंतर आरटीओ कार्यायाकडून जागेवरच मिळावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

वाहन नोंदणीचे दस्तावेज हे टपालाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठविले जातात. मात्र, चुकीचा पत्ता किंवा वाहनमालक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आरटीओ कार्यालयात परत येतात. परत आलेले दस्तावेज सबंधितांना ताब्यात घेण्यासाठी पुरावा देणे व टपाल शुल्क भरणे हे शासन निर्णया नुसार बंधनकारक आहे. या नियमाबाबत बदल करण्याचा सर्वस्वी अधिकार शासनाचा आहे.
– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.