22 प्रकारची कागदपत्रे आवश्यक, मुख्याध्यापकांना हमीपत्राची सक्ती
पिंपरी – नेहमीच्या वर्गातील शिक्षणाबरोबरच परिसराचे ज्ञान मिळावे, म्हणून आयोजित करण्यात येत असलेल्या शाळांच्या शैक्षणिक सहली यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सहलींना आता जाचक अटींचे विघ्न आल्याचे दिसत आहे.
शैक्षणिक सहली काढण्यासाठी शाळेतील शिक्षकांना एक, दोन नव्हे तर तब्बल 22 प्रकारची कागदपत्रे गोळा करावी लागत असल्यामुळे सहल आयोजित करण्यासाठी शिक्षक मेटाकुटीस आले आहेत. त्यास भरीस भर म्हणून यावर्षी पासून शाळेच्या मुख्याध्यापकांनाही 100 रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र सक्तीचे केले आहे. त्यामुळे, बहुतांश शाळेचे शिक्षक शैक्षणिक सहलीची भानगडच नको, असे म्हणून शैक्षणिक सहल टाळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक माहिती मिळावी, त्यांनी प्रत्यक्ष गडकिल्ले पहावेत, इतिहास आणि भूगोल समजून घ्यावा. या माध्यमातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे; यासाठी मागील कित्येक वर्षांपासून शालेय सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, मागील काही वर्षात घडलेल्या प्रकारामुळे शैक्षणिक सहली नेण्यावर शासनाच्या शिक्षण विभागाने विविध निर्बंध आणले होते. मात्र, त्यानंतर 20 मे 2017 च्या निर्णयानुसार पालकांच्या सहमतीने शाळेला वर्षातून एकदाच सहल नेता येईल, असा आदेश काढण्यात आला. परंतु हे करीत असताना अनेक कागदपत्रांची पूर्तता शिक्षकांनी करणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे, विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेताना शिक्षकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करतानाच अधिक धावाधाव करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेताना शिक्षकांना शाळा समितीचा ठराव, सहल जी.आर, गटशिक्षण अधिकारी पत्र, आगारप्रमुख एस.टी अर्ज, केंद्रप्रमुख पत्र, शिक्षक विस्तार अधिकारी पत्र, पालक संमतीपत्र, विद्यार्थी संमती पत्र, सहभागी विद्यार्थी यादी, शिक्षक यादी, सहभागी विद्यार्थी व शिक्षक हजेरी पत्रक, नियमावली, नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा, सहल खर्च अंदाजपत्रक, प्रथमोपचार पेटीसोबत असलेले पत्र, विद्यार्थी-शिक्षक ओळखपत्र, विद्यार्थी साहित्य यादी, शिक्षणाधिकारी मान्यता पत्र, सक्ती न केलेले विद्यार्थी संमती पत्र, सहल महाराष्ट्र राज्याबाहेर जात नसल्याबाबत मुख्यध्यापकांचे हमीपत्र ही कागदपत्रे सादर केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडून सहलीसाठी परवानगी दिली जाते. एवढी कागदपत्रे जमविताना शिक्षक मेटाकुटीला येत असल्यामुळे अनेक शिक्षकांनी शैक्षणिक सहलीच काढणे बंद केले आहे.
100 रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र
शैक्षणिक सहल काढण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शासनाने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुख्यध्यापकाचे हमीपत्र सक्तीचे केले आहे. यावर एस.टी महामंडळाच्या गाड्या सहलीसाठी नेण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना सहलीसाठी सक्ती केलेली नसल्याचे नमूद करावे लागत आहे. एवढे सगळी कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यापेक्षा शैक्षणिक सहल न नेलेली बरी अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळातून करण्यात येत आहे.