पिंपरी – पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या पाऱ्याची घसरण थांबली आणि तापमानात किंचित वाढ झाली. पुणे शहरातील किमान तापमानात गुरुवारी थोडी वाढ होऊन 15.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
दिवाळीनंतर आलेल्या चक्रीवादळामुळे पावसाचा मुक्काम वाढला होता. हवामान कोरडे असल्याने गेल्या काही दिवसांपासून थंडीत चढउतार होत आहे. पहाटे आणि सायंकाळी 7 नंतर हवेत गारवा जाणवू लागला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत किमान पारा कमी होऊ लागला आहे. मागील काही काही दिवसांमध्ये पारा 14 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला होता आणि बोचरी थंडी जाणवू लागली होती.
गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून तापमान घसरले होते. अजूनही अधूनमधून ढगाळ वातारण निर्माण होत आहे. त्यामुळे थंडीचा परिणाम तेवढ्या तीव्रतेने जाणवत नसला तरी गार हवेमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी कमी होऊन काहीसा उकाडा वाढला आहे. हे वातावरण आणखी दोन दिवस राहणार आहे. राज्यात बहुतांशी भागांत कमाल तापमान 30 अंशांच्या पुढेच आहे. रात्री उशिरापर्यंत उकाडा कायम असून पहाटे तापमानात घट होऊन गारठा काहीसा वाढत आहे. मात्र, किमान तपमानाचा पारा सरासरीच्या वरच आहे.