पिंपरी – महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यामध्ये वाहनचालकांना पेट्रोल कंपन्यांनी दरवाढीचा शॉक दिला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल दहा रुपयांनी पेट्रोल महागले आहे. डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. सलग 30 ते 40 दिवसांपासून रोज पेट्रोलची दरवाढ होत असल्याने वाहनचालका पुरते हैराण झाले आहेत.
आक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला 70 रुपये 79 पैसे असा पेट्रोलचा दर होता. आक्टोबर महिन्यात यामध्ये थोडी-थोडी रोजच वाढ झाल्याने नोव्हेंबच्या पहिल्या आठव6ड्यापर्यंत हे दर 76 रुपयांपर्यंत पोहोचलेले पेट्रोलचे दर आता 78.79 रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या रोजच पेट्रोलची दरवाढ ही दोन किंवा तीन पैसे अथवा दहा पैशांपर्यंत होत आहे.
किरकोळ पद्धतीने होत असलेली वाढ ही ग्राहकांच्या लक्षात येत नसली तरी अवघ्या साठ दिवसांत 9 रुपयांनी पेट्रोल वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे. पेट्रोची दरवाढ होत असताना डिझेल मात्र स्थिर आहे. 1 नोव्हेंबर रोजी डिझेलचा दर 67.86 रुपये होता. त्यानंतर आता यामध्ये पाच पैशांनी घट झाली असून आज दि. 28 नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात डिझेल 67.81 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे.