वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज : प्रभागांची रचना लवकरच
पुणे – आगामी निवडणुकांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील प्रभागांची आरक्षण रचना निश्चित करा, असे आदेश संरक्षण मालमत्ता विभागाने कॅन्म्टोन्मेंट बोर्डाला दिले आहेत. त्यानुसार लवकरच प्रभागातील आरक्षण निश्चित केले जाणार आहे. मात्र, नवीन आरक्षणानुसार सध्या महिलांसाठी राखीव प्रभाग आता सर्वसाधारण गटासाठी खुले होण्याचा अंदाज बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाच वर्षांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2020मध्ये बोर्डाची निवडणूक होणार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार बोर्डाकडून लवकरच प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. सध्या बोर्डातील प्रभाग क्रमांक एक, सात आणि आठ हे महिलांसाठी राखीव आहेत.
नवीन रचनेनुसार महिलांसाठी राखीव असलेले प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले होण्याचा अंदाज असून प्रभाग क्रमांक दोन, तीन, पाच आणि सहा यापैकी तीन वॉर्ड चिठ्ठ्या काढून महिलांसाठी आरक्षित केले जाणार आहेत. तर प्रभाग क्रमांक चार हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला होता. तो यंदाही या प्रवर्गासाठी राखीव राहण्याची दाट शक्यता आहे.
महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून नगरसेविका प्रियंका श्रीगिरी, किरण मंत्री आणि रूपाली बिडकर या निवडून आल्या आहेत. नवीन प्रभाग रचनेत आरक्षण बदलल्यास या नगरसेविकांना पुन्हा लढण्याची संधी मिळेल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.