पिंपरी – हातामध्ये आलेल्या स्मार्टफोनने फोटोग्राफी लयास जाईल, असे चित्र असताना वेडिंग फोटोग्राफीची क्रेझ आली. त्यापाठोपाठ लग्नानंतरचे सोनेरी क्षण जतन करण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे. लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड असतानाच आता डोहाळे लागलेल्या पत्नीसोबत प्री-मॅच्युर फोटोग्राफीच्या प्रेमात तरुणाई पडलेली दिसत आहे.
पूर्वी साखरपुड्यापासून ते लग्नाच्या बिदाईपर्यंतचे फोटो काढून त्याचा छानसा अल्बम तयार केला जायचा. त्यानंतर त्यासोबतच व्हिडिओ शुटिंगचाही जमाना आला. जस जसे विवाह सोहळे विस्तारत केले तसा यामध्ये बदल होत गेला. छायाचित्रण व शुटिंगच्या माध्यमातून विवाह सोहळ्याचे सोनेरी क्षण जतन करून ठेवले जात आहे. त्यासोबतच आता गेल्या काही वर्षांत प्री वेडिंग फोटोशुटची संकल्पनाही तरुणाईला चांगलीच भावली. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन लग्नापूर्वी छायाचित्रण व चित्रीकरण हा नवा व्यवसाय उदयाला आला. आता त्याहीपुढे जात तरुणाईमध्ये प्री मॅटर्निटी फोटशुटची क्रेझ वाढत आहे.
लग्नानंतर नवदाम्पत्यांकडून साहजिकच गोड बातमीची अपेक्षा केली जाते. कुटुंबात नवीन सदस्य येण्याची चाहूल लागताच कुटुंबियांकडून सुनबाईचे गोड कौतुक केले जाते. तिने काय खावे काय करावे याची काळजी घेतली जाते. याच डोहाळेचे आनंदी क्षण आयुष्यभरासाठी जपून ठेवण्याचा आग्रह तरुणाई करत आहे. त्यासाठी प्री मॅटर्निटी फोटोशूटची तरुणांना चांगलीच भुरळ पडली आहे. चित्रपट व मालिकाच्या माध्यमातून आलेल्या या ट्रेंडचा तरुणांवर चांगलाच प्रभाव पडत आहे. अनेक दांम्पत्य निसर्गरम्य व धार्मिक स्थळी जाऊन प्री-मॅटर्निटी फोटोशूट करतात. दिवसागणिक तरुणांमध्ये येणाऱ्या नव्या ट्रेंडमुळे फोटोग्राफरर्सना चांगले दिवस आले आहेत. कुटुंबातील सदस्यांचीही सोनेरी क्षण जपण्याची इच्छा असते. मात्र बाळ व आईला काही धोका होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
विविध अल्ब्मस्ना पसंती
लग्नसोहळ्याच्या फोटोसाठी ज्या पद्धतीने विविध प्रकारचे अल्बम वापरले जातात, तसेच प्री मॅटर्निटी फोटोशूटसाठीही वापरले जात आहेत. करिझ्मा आणि डिजिटल प्रिंटींग अल्बम सध्या चांगलेच भाव खात आहेत. थ्रीडी ऍनिमेशनलाही दाम्पत्यांकडून मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे अनेक दाम्पत्यांकडून केवळ फोटोशूट करण्यात येते. त्याचा डेटा फोटोग्राफर्सकडून घेऊन त्याची सीडी बनवून ठेवली जाते. यामुळे अर्थिक खर्च ही वाचतो. तर अनेक हौसी दाम्पत्याकडून महागडे आणि डिजिटल अल्ब्मस तयार करून घेतले जातात. पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत या अल्ब्मसला खर्च येत असल्याचे फोटोग्राफरकडून सांगण्यात आले.
प्री-मॅटर्निटी फोटोशूटसाठी बरेचदा दाम्पत्य निसर्गरम्य ठिकाणी जात असतात. नदीकाठी किंवा डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी फोटो काढले जातात. मात्र यामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. बरेचदा अशी ठिकाणे शहरी वस्तीपासून लांब असतात. फोटो शूट करताना जास्त लांबच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. तसेच चढ-उताराच्या जागा पाहूनच फोटो शूट करावे. बाहेर जात असताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभागप्रमुख, वायसीएम.