‘शब्दसहली’तून जोडले शब्दांशी नाते : माधुरी सहस्त्रबुद्धे

पुणे – मराठी भाषेच्या संदर्भात काळजी करावी अशीच सध्या परिस्थिती आहे. ‘शब्दसहल’ या लहान मुलांसाठी आयोजित अभिनव उपक्रमांतून मुलांचे शब्दांशी नाते जोडायला निश्चितपणे बळ मिळेल, असे मत बालरंजन केंद्राच्या प्रमुख आणि नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

‘शब्दसारथी’ आणि ‘प्रक्रिया वाचन कट्टा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शब्दसहल’ या अनोख्या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. सहस्त्रबुद्धे यांनी मुलांशी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला आणि दोन बाल कविताही म्हणून दाखवल्या.

या प्रसंगी ‘शब्दसारथी’ चे संस्थापक संचालक पराग पोतदार यांनी शब्दसहलीच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रक्रिया वाचन कट्ट्याचे सचिन आणि मुग्धा नलावडे यावेळी उपस्थित होते. बारामती, थेरगाव, मुंबई, पिंपरी चिंचवड या भागांतून ही मुले सहलीमध्ये आवर्जून सहभागी झालेली होती. पाषाण येथील पुणे महापालिकेच्या ग्रामसंस्कृती उद्यान आणि एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन सोमेश्वर मंदिराला मुलांनी भेट दिली.

या निमित्ताने मुलांशी संवाद साधण्यासाठी ‘महाराष्ट्राचा बर्डमॅन’ सुमेध वाघमारे आणि गोष्टी सांगून रंगवणारा श्रीधर कुलकर्णी अर्थात गट्टूदादा यांनी मुलांना रंगवून ठेवले. ग्रामसंस्कृती उद्यानामध्ये फिरून मुलांनी ग्रामीण जीवन आणि बारा बलुतेदारी पद्धती अनुभवली व त्याचा आनंद लुटला. शब्दांशी निगडीत अनेक खेळ मुले तिथे आनंदात खेळली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.