रशिया, अमेरिकेमुळेच महायुद्धाचा धोका
टोकियो, दि. 24 – जागतिक युद्धाचे उगमस्थान इंडोचायना अगर इतर तणावाची क्षेत्रे हे नसून दोन बडी राष्ट्रे रशिया व अमेरिका यांचे मुळेच जागतिक युद्ध ओढवू शकेल. कारण ही राष्ट्रे शस्त्रबळ वाढवीत आहेत व युद्धाची तयारी करीत आहेत. असे मत चीनने व्यक्त केले असून तसा इशारा जगाला दिला आहे.
आर्यभट्टा’वरील वीजपुरवठ्यात व्यत्यय
नवी दिल्ली – भारताचा उपग्रह “आर्यभट्ट’ याचेवरील वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्यामुळे त्याचे वरील प्रयोग तूर्त बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. वीजपुरवठ्यात का व्यत्यय येत आहे ते समजत नाही, असे अंतराळ संशोधन केंद्राचे प्रमुख प्रो. राव यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर नाहीत
कलकत्ता – लोकसभेच्या निवडणुकीबरोबर एखाद्या राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतल्या जाण्याची कल्पना केंद्रीय शेतीमंत्री जगजीवनराम यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, जेथे निवडणुकीची मुदत भरलेली नाही तेथे निवडणुका घेण्याचे कारण काय?
मनप्रसन्नता आरोग्याचे लक्षण
वाई – मनाची प्रसन्नता हा एक अत्यंत मोलाचा गुण आहे. सुख- दुःखाची ज्यामुळे अनुभूती येते ते मन. आज मनाची शांतता टिकविणे अवघड झाले आहे. मन हे चंचल असल्यामुळे ते कशात तरी गुंतविले पाहिजे. शरीर, आरोग्य संपन्न ठेवायचे असेल तर मन प्रसन्न पाहिजे, असे विचार डॉ. गोविंद खरे यांनी मांडले.