पुणे – सध्या शहरात वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात करवाई करण्यात येत आहे. नागरिकांप्रमाणे शहर पोलिसांतील काही कर्मचारीही नियम पाळत नाहीत, अशा पोलिसांचे फोटो काढून पुणेकरांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना व्हॉट्स ऍपवर पाठवले होते. त्याची दखल घेऊन उपायुक्तांनी संबंधित पोलिसांना इ-चलनाद्वारे दंड केला आहे.
शहराच्या विविध भागांत सध्या वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस सीसीटीव्हीचा वापर करत असून ई-चलनद्वारे दंड ठोठावत आहेत. शहर पोलीस दलातील अनेक पोलीस हेल्मेट न घालता वाहने चालवितात, वाहनांवर फॅन्सी नंबर टाकतात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे पहावयास मिळते.
वाहतुकीचे नियम तर सर्वांना सारखेच आहेत, मात्र सीसीटीव्हीव्दारे दंड करणारे पोलीस ऑपरेटर पोलिसी गणवेष दिसल्यानंतर त्यांना दंड आकारत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील सुजाण पुणेकरांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांचे फोटो काढून पोलीस उपायुक्तांना पाठविले.
उपायुक्तांनी त्याची चौकशी करून त्यामध्ये सत्यता आढळली आहे. एम.एच-12 क्यु.यु. 007 यास परिवहन खात्याने दिलेला नंबर नोंदविला नाही. त्यामुळे 500 रुपये आणि एम.एच.-12, इ.यु.1850 या क्रमांकाच्या पोलीस वाहनचालकास हेल्मेट न घातल्यामुळे 500 रुपयाचा दंड ठोठावला आहे.