गावात वाढविला पोलीस बंदोबस्त
भवानीनगर – काटेवाडीचे सुपुत्र आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ सकाळी अचानक घेतली. परंतु, बाप माणूस असलेल्या शरद पवार यांच्याशी बंडखोरी करीत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने काटेवाडीत आनंदोत्सव होण्याऐवजी गावात तणावपूर्ण शांतात होती. यामुळे खबरदारी म्हणून काटेवाडी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.
राज्याची विधानसभेची निवडणूक झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत जी उत्सुकता होती तेवढीच उत्सुकता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? याची असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्तास्थापनेचा निर्णय घेतला असताना अजित पवार यांनी रात्रीच्या रात्रीच राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपला पाठिंबा दिला. तसेच, उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या सर्व गोष्टींचा परिणाम काटेवाडीतही झाला. यातून गावात तणावपूर्ण चर्चा सुरू झाली. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार स्थापन करणार असताना अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय राजकारणालाच नव्हे तर पवार कुटुंबीयांच्या एकीलाही फूट पाडणारा ठरला. यातून काटेवाडी परिसरात चौकांमध्ये तसेच्या त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला.
काटेवाडी गावातील पालखी ओटा याठिकाणी कायमस्वरूपी तरुणांची आणि नागरिकांची वर्दळ असते याही ठिकाणी या अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे शुकशुकाट होता. सर्व राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांच्यापुढेही मोठा पेचप्रसंग निर्माण
झाला आहे.