राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी राष्ट्रपतींच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सर्वांना वाटत असतानाच एका रात्रीतून राज्यातील सर्वच चित्र बदलले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष अधिकारांचा वापर करुन एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. तसेच एका वृत्तसंस्थेव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमांनाही इथे आमंत्रण देण्यात आले नव्हते. अजित पवारांनी राष्ट्रवादी आमदारांच्या संमती पत्राचा दुरुपयोग करत ते राज्यपालांना सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला.


एकंदरीत या संपूर्ण शपथविधीच्या घडामोडींबद्दल जनतेमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेले आहेत.

राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या आधारावर शपथविधीसाठी निमंत्रण पाठवले ? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देण्याची शक्‍यता आहे. राज्यपाल कोश्‍यारी हे या भेटीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रपतींसोबत चर्चा करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोणती भूमिका घेतली जाणार ? यासंदर्भात ही चर्चा होणार आहे. संविधानिक अडथळ्यांवर देखील यामध्ये चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.