टोयोटा इनोव्हा क्रिस्टा हे भारतातील सर्वाधिक खपाचे मल्टिपर्पज व्हेईकल म्हणजे एमपीव्ही असून हे जीडी डिझेल व ड्युअल व्हीव्हीटी-1 पेट्रोल इंजिन प्रकारात उपलब्ध आहे. यामध्ये सिक्वेंशिअल शिफ्टसह सहा सुपर ईसीटी अंतर्भूत आहेत. त्याचबरोबर इकॉनॉमिक आणि पॉवर मोड उपलब्ध करण्यात आल्यामुळे गरजेनुसार वाहन चालविणे शक्य होते.
चालकामागील आसनाच्या रांगेत चटकन बदल करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे मोठ्या कुटुंबासाठी प्रवास करताना आवश्यक ती अदलाबदल करता येते. पीच अँड बाऊंस कंट्रोलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 7 आणि 8 सीटरमध्ये उपलब्ध करण्यात आली असून ग्राहक आपल्या सोयीनुसार निवड करू शकतात. अंतर्गत सजावट आरामदायक असून यामध्ये तीन रंग उपलब्ध करण्यात आले आहेत. ही गाडी सुरू झाल्यापासून उत्तरोत्तर लोकप्रिय होत असल्यामुळे भारतात आणि भारताबाहेरही चिकित्सकांच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचा विषय झाला आहे. गाडीची किंमत बरीच असूनही ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करून गाडी खरेदी करीत असतात.
इनोव्हा नाव दर्जा आणि विश्वासाशी जोडले गेले असल्यामुळे ग्राहक टोयोटा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करीत असताना फारशी तडजोड करीत नाहीत. टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये 4 इंजिन गिअर बॉक्स उपलब्ध आहेत. 2.7 लिटर पेट्रोल इंजिनसाठी मॅन्युअल आणि ऑटो गिअर बॉक्सेस देण्यात आलेले आहेत. डिझेल इंजिनमध्ये 2.4 लिटर मोटर आणि 2.8 लिटर मोटर उपलब्ध आहे. यामध्ये पहिल्या पर्यायात मॅन्युअल गिअर बॉक्स तर दुसऱ्या पर्यायात ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहेत.
या गाडीचा ब्रॅंड भारतामध्ये स्थिर झाल्यामुळे ही गाडी विकताना वितरकांना फारसा त्रास होत नाही. गाडीच्या आत भरपूर जागा असून इंटेरिअर डेकोरेशन उत्तम दर्जाचे आहे. त्याचबरोबर सामान ठेवण्यासाठी मुबलक जागा असल्यामुळे दूरच्या प्रवासासाठी ही गाडी अधिक आरामदायक ठरली आहे. त्याचबरोबर कंपनीकडून देखभालीसाठी उत्तम सहकार्य मिळते. शहराबरोबर शहराबाहेरही ही गाडी प्रवासासाठी उपयोगी असल्याचे सिद्ध झालेले आहे.