अमिताभ बच्चन यांची तब्येत काही काळापूर्वी ठीक नव्हती. त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरिही त्यांनी आपले नियमित शुटिंग सुरूच ठेवले आहे. सध्या त्यांच्या “झुंड’ या आगामी सिनेमाबाबत एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. हैदराबादेतील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी “झुंड’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. “झुंड’मध्ये कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी आपल्या नोटीसीमध्ये केला आहे. “झुंड’ची निर्माते असलेले टी-सिरीजचे अध्यक्ष कृष्ण कुमार, भूषण कुमार, अमिताभ बच्चन, यांच्यासह दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
स्लम सॉकर विजय बरसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. टी-सिरीजने आपल्याला धोका दिला, धमकावले असेही या नोटीसीमध्ये म्हटले आहे. 2017 मध्ये आपण स्लम सॉकर खेळाडू अखिलेश पॉलच्या जीवनावर सिनेमा बनवला होता. पॉल होमलेस वर्ल्ड कपचे कॅप्टन होते. या सिनेमाची कथा आणि पटकथेचे रजिस्ट्रेशनही आपण केलेले आहे, असा दावा चिन्नी कुमार यांनी केला आहे. मात्र टी-सिरीजने त्याच विषयावर सिनेमा करायला घेऊन कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.