शेवटच्या दिवशी तब्बल 600 अर्ज झाले दाखल
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – पुणे विभाग मधील पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या शेवटच्या दिवसाखेर खेड तालुक्यात 2 हजार 394 पदवीधर व 560 शिक्षक मतदारांनी मतदार अर्ज दाखल केले असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले, नायब तहसीलदार मालती धोत्रे यांनी दिली. बुधवारी (दि. 6) शेवटचा दिवस होता, त्यामुळे अर्ज जमा करण्यासाठी पदवीधर मतदारांनी रांगा लागल्या होत्या.
पुणे विभागातील म्हणजेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे या पाच जिल्ह्यांतील रहिवासी असलेल्या तसेच 1950 ते 1 नोव्हेंबर 2016 अखेर पदवीधारक किंवा डिप्लोमाधारक मतदारांची मतदार नोंदणी सुरू होती. त्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. या नोंदणी करिता कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा कोणत्याही शाखेचा 3 वर्षाचा डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्यातर्फे पदवीधर मतदारांनी फॉर्म 18 भरून द्यावयाचा होता.
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी सर्वत्र सुरू होती. मध्यंतरी विधानसभा निवडणूक धामधूम सुरू असल्याने ही नोंदणी ठप्प झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुका झाल्याबरोबर नोंदणीची गती वाढली. भरलेले अर्ज खेड तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत देण्यासाठी दोन दिवस मोठी गर्दी झाली होती आहे. बुधवारी दिवसभरात सुमारे 600 पेक्षा अधिक पदवीधर मतदारांनी नोंदणी अर्ज सादर केले.