धोरणात्मक निर्णय घेणार : सुनील कांबळे यांची माहिती
पुणे – यापुढे महापालिकेत कोणत्याही प्रकल्पासाठी सल्लागार नेमणार नाही. यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार सुनील कांबळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
“एसीएमटीआर’ प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यासाठी 2 कोटी रुपये खर्चून सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. तो प्रस्ताव 15 दिवस समितीने पुढे घेतला, मात्र यापुढे कोणत्याही प्रकल्पात सल्लागार नेमणार नसल्याचे कांबळे यांनी नमूद केले.
अधिकाऱ्यांची नेमणूक ही त्याच कामासाठी केलेली असते. त्यामुळे डीपीआर, आराखडा आणि अन्य नियोजनाचे काम त्यांनीच करणे अपेक्षित आहे. प्रत्येक कामात पैसे खर्चून सल्लागार नेमावे लागत असतील तर “वेल क्वालिफाइड’ अधिकाऱ्यांची गरजच काय. ते त्यातील तज्ज्ञ, इंजिनीअर आहेत म्हणूनच त्यांची नेमणूक विभाग प्रमुखपदी केली असते. असे असताना सल्लागारावर एवढी मोठी रक्कम खर्च करण्याची आवश्यकता नाही, असे कांबळे यांनी सांगितले.
“एचसीएमटीआर’च्या डीपीआर सल्लागाराचा प्रस्ताव 15 दिवस पुढे ढकलला असला तरी सल्लागार नेमण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी बोलून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे कांबळे यांनी नमूद केले.
मात्र, सल्लागार न नेमण्याचा निर्णय हा अधिकाऱ्यांवरील रागापोटी घेतला का, याबाबत मात्र महापालिका वर्तुळात तर्कवितर्क सुरू होते. 15 दिवसांनंतर या प्रस्तावावर कोणता निर्णय होतो, त्यावर हा निर्णय पक्का होतो की कच्चा हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.