हडपसर, वडगावशेरीत राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर
पुणे – पुणे शहरातील आठपैकी दोन मतदारसंघ राखण्यात भाजपला अपयश आले असून, हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात खिंडार पाडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा वर्चस्व निर्माण केले आहे. हडपसर आणि वडगाव शेरीमधील भाजपचे विद्यमान आमदार अनुक्रमे योगेश टिळेकर आणि जगदीश मुळीक यांचा पराभव करून याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनुक्रमे चेतन तुपे आणि सुनील टिंगरे निवडून आले आहेत. शहरात आठपैकी सहा मतदारसंघ भाजपने राखले आहेत.
यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघात विद्यमान महापौर मुक्ता टिळक, कोथरूड-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर-विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, पर्वती-विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, खडकवासला- विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे हे निवडून आले आहेत. दरम्यान, 2014च्या तुलनेत या 6 विजयी मतदारसंघांत भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले असून जवळपास सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार लढत दिली आहे. त्यामुळे पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात आघाडी मिळूनही भाजपला मोठे हादरे बसले आहेत.