खासदार श्रीरंग बारणे यांचे आवाहन
पिंपरी – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी शासन दरबारी यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक प्रश्न सुटले, तर काही प्रलंबित प्रश्नांवर फक्त अंतिम निर्णय होणे बाकी राहिले आहे. मतदारसंघाच्या शास्वत विकासासाठी आणि उर्वरित प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी लक्ष्मण जगताप हेच पुन्हा आमदार होणे काळाची गरज आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार जगताप राज्यातील क्रमांक एकचे मताधिक्य देऊन निवडून आणा, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
मतदारसंघातील शिवसैनिक आमदार जगताप यांच्यासोबत असल्याचेही ते म्हणाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त थेरगावमध्ये बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवड विधानसभा मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे. या मतदारसंघातून फेरफटका मारल्यानंतर झालेल्या विकासकामांचा आपणाला अंदाज येतो. मतदारसंघात आजही अनेक मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या विकासकामांच्या जोरावरच चिंचवड मतदारसंघाची विकासशील मतदारसंघ म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.
या मतदारसंघात उभारण्यात आलेले रस्त्यांचे जाळे नागरिकांचा प्रवास सुखकर करतो. मतदारसंघात तयार केलेल्या मोठ्या बीआरटीएस रस्त्यांमुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे अभियंते, कामगार व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यास मदत होते. या सर्वांचा वेळ अजूनही वाचावा म्हणून रस्त्यांची आणखी काही कामे सुरू आहेत. पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते प्रशस्त केले गेल्याने त्याचाही फायदा नागरिकांना होतो. मतदारसंघात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर उभारून नागरिकांचा प्रवास विनाअडथळा व जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत झाली आहे.
ही सर्व कामे आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासात आमदार जगताप यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी चिंचवड मतदारसंघात मेट्रो प्रकल्प आणण्यासाठी प्रशासनाकडे मोठा पाठपुरावा केला आहे. लवकरच चाकण ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग मंजूर होऊन कामाला सुरूवात केली जाणार आहे. निगडी ते दापोडी हा मेट्रो मार्गही आमदार जगताप आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने सुरू झाला आहे. हा मार्ग पूर्णत्वास आला असून, काही महिन्यांतच त्याचे उद्घाटन होणार आहे. आमदार जगताप चिंचवड मतदारसंघासोबतच शहराच्या अन्य भागातही रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण कमी व्हावे, शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लागावी, रुग्णालयांचे सक्षमीकरण आणि मुबलक व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आमदार जगताप यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते आग्रही आहेत. आमदार पदाचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्यात ते कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यामुळे पुढील पाच वर्षांत राज्यातील एक आदर्श मतदारसंघ बनणार आहे.यासाठी लक्ष्मण जगताप यांनी पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे.