“सातबारा’शी मोबाइल क्रमांक होणार लिंक

जमीन मालकाची मिळकत सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न

पुणे – सातबारा उताऱ्यावरील जमीन मालकाची मिळकत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक खातेदाराचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी व पत्ता याची माहिती घेतली जाणार आहे. सातबारा उताऱ्याशी मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारसनोंद, बोजा आदींची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून समजणार आहे. तसेच, जमिनीची परस्पर विक्री होत असेल तर, खातेदारांना एसएमएसच्या माध्यमातून समजणार असून जमीन मालकाची फसवणूक रोखणे शक्‍य होणार आहे.

मागील काही वर्षांपासून जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे जमीन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बोगस व्यक्‍तीला उभे करून जमिनीचे दस्त केल्याचे प्रकार घडतात. दस्त नोंदणी झाल्यानंतर जमीन मालकाला फसवणूक झाल्याचे कळते. त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, परस्पर गहाणखत करणे आदी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले. असे प्रकार टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीची माहिती संबंधित जमीन मालकाला होण्यासाठी महसूल विभागाने सातबारा उताऱ्याशी मोबाइल क्रमांक लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेदारांनी अचूक माहिती ऑनलाइन पद्धतीने तलाठी यांच्याकडे पाठवायची आहे. त्यासाठी “ई-हक्‍क’ प्रणालीमध्ये संकेतस्थळावर ही माहिती भरणे आवश्‍यक आहे.

कोणत्याही खातेदाराची जमीन मिळकत पूर्णपणे सुरक्षित राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक बदलाची माहिती एसएमएसच्या माध्यमातून संबंधित खातेदाराला उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे खातेदाराची फसवणूक होणार नाही.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा ई-फेरफार प्रकल्पाचे समन्वयक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)