गुन्हेगारांची पळापळ; प्रतिबंधात्मक कारवाई वाढली
पिंपरी: विधानसभा निवडणूका जवळ येत चालल्यामुळे पोलिसांनी आपल्या कारवायांमध्येही वाढ केली आहे. शहरात ठिकठिकाणी रूट मार्च करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्टी भागांमध्ये दिवसा आणि रात्रीही कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई वाढविल्याने गुन्हेगारांची एकच पळापळ झाली आहे.
निगडीत रूट मार्च
विधानसभा निवडणूका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी निगडी पोलिसांनी शनिवारी सकाळी साडेदहा ते साडे बारा वाजताच्या दरम्यान निम लष्करी दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्यासह निगडीच्या यमुनानगर, साईनाथ नगर, निगडी गावठाण, अजंठा नगर, थरमॅक्स चौक या भागातून रूट मार्च केले. तर सायंकाळी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्वरित भागात रूटमार्च करण्यात आले.
पिंपरीत कोम्बिंग ऑपरेशन
पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी परिसरात पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये स्थानिक पोलिसांसह निम लष्करी दलाचे जवान सहभागी झाले होते.