उत्सवाच्या काळात कमी व्याजदराचा ग्राहकांना होणार फायदा
पुणे – स्टेट बॅंकेने काल आपल्या जुन्या पद्धतीच्या व्याजदरात कपात केल्यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील महाराष्ट्र बॅंकेनेही आपल्या एमसीएलाआरमध्ये म्हणजे कर्जावरील जुन्या पद्धतीच्या व्याज दरांमध्ये कपात केली आहे.
एमसीएलआर म्हणजे मार्जिनल कॉस्ट बेस्टड् लेडिंग रेट्स या पद्धतीने बॅंकेच्या ठेवींचे व कर्जाचे मूल्यांकन करून व्याजदर ठरविला जातो. महाराष्ट्र बॅंकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार या बॅंकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 8.40 टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर एका दिवसासाठीचा आणि सहा महिन्यासाठीचा एमसीएआरही कमी करण्यात आला असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
हे नवे व्याजदर 8 ऑक्टोबरपासून अंमलात आले असल्याचे बॅंकेने सांगितले आहे. मात्र, बॅंकेचा बेस रेट 9.50 टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बॅंकेने आपल्या रेपो दरात पाव टक्के कपात केल्यानंतर याअगोदरच महाराष्ट्र बॅंकेने रेपो आधारित कर्जावरील व्याज दरात पाव टक्क्यांनी कपात जाहीर केली आहे.
इतर बॅंकाही अशाप्रकारची कपात करणार
भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कालच आपल्या एमसीएलआर दरात कपात जाहीर केलेली आहे. इतर बॅंकाही अशाप्रकारची कपात या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता
आहे.