सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांची संपत्ती अब्जावधीची असून तेच उमेदवारांमध्ये श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची स्थावर व जंगम मालमत्ता 251 कोटी 82 लाख 50 हजार रुपयांची आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती बाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र, जनता सहकारी बँक, कराड अर्बन बँक, एसबीआय, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, आयसीआयसीआय या बँकांमध्ये चार कोटी नऊ लाख 26 हजार 240 रुपयांच्या ठेवी आहेत .
त्यांनी विविध बँका शेअर्स आणि बिटकॉइन मध्ये एक कोटी तीन लाख 74 हजार 140 रुपयांची गुंतवणूक केली आहे. उदयनराजे भोसले यांच्याकडे आलिशान वाहने असून त्यामध्ये जिप्सी, ऑडी, मर्सिडीज बेंज, फॉर्चुनर, स्कॉर्पिओ, बीएमडब्ल्यू या वाहनांचा समावेश आहे. ट्रॅक्टरसह या वाहनांची किंमत सुमारे दोन कोटी दहा लाख पाच हजार इतकी आहे.
त्यांनी सेंट पीटर्स स्कूल पाचगणी येथे दहावीपर्यंतचे तर पुण्यातील फरग्युसन कॉलेजमधून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. उदयनराजे यांची सातारा, गोडोली, कोडोली, धनगरवाडी, सोनगाव, पेट्री नवी लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे शेकडो एकर जमीन व दुकान गाळे आहेत.
उदयनराजे यांच्याकडे कोट्यवधीचे जडजवाहीर
त्यांच्याकडे 43 किलो 296 ग्रॅम सोने व चांदीचे दागिने असून त्याची किंमत 3 कोटी 46 लाख 31 हजार 169 इतकी आहे. उदयनराजे भोसले यांच्यावर अंदाजे दोन कोटी 44 लाख 63 हजार 842 इतके कर्ज आहे.
कोरेगाव पार्क कल्याणी नगर, पुणे येथे फ्लॅट्स आहेत. खासदार उदयनराजे यांची स्थावर मालमत्ता 20 कोटी 55 लाख 51 हजार 394 रुपयांची असून जंगम मालमत्ता दोन कोटी 90 लाख 35 हजार 645 रुपये इतकी आहे . स्वसंपादीत मालमत्ता 28 कोटी 4 लाख 66 हजार 670 रुपये आहे तर वारसा प्राप्त मालमत्ता 174 कोटी 52 लाख 15 हजार 877 इतकी आहे.