आमदार थोपटे : भोर विधानसभेच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत 553 कोटींचा निधी मिळवला
भोर – राज्याच्या विधानसभेत अधिवेशन काळात आमदार संग्राम थोपटे यांनी 93 टक्के उपस्थिती नोंदवलेली आहे. त्यांनी गेल्या 5 वार्षांत 984 प्रश्न तारांकित करून 48 लक्षवेधी सूचना मांडल्या. 154 औचित्याचे मुद्दे उपस्थित करून विविध चर्चांमध्ये भाग घेऊन भोर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशन काळात आक्रमक भूमिका घेतलेली असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांनी यासाठी विधानसभेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केले आहे.
गुंजवणी व नीरा देवघर धरण प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांनी लक्षवेधी सूचना मांडून सोडवण्यात योगदान दिले आहे. भाटघर धरण प्रकल्पातील 41 गावांना नागरी सुविधा देणे, नीरा देवघर धरण प्रकल्पातील डाव्या कालव्यास मंजुरी मिळवणे, धोमबलकवडी धरण प्रकल्पांतर्गत टिटेघर कोर्ले, वडतुंबी योजनेस मान्यता मिळवण्यासाठी लक्षवेधी सूचना मांडून मंजुरी मिळवली असून, हे काम प्रगतीपथावर असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.
आमदार थोपटे म्हणाले की, मतदारसंघातील विकासकामांसाठी गेल्या पाच वर्षांत 553 कोटी रुपयांचा निधी मिळवला असून, यात मतदारसंघात पंतप्रधान घरकूल योजनेत 4654 घरकुले मंजूर आहेत, यासाठी 116 कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 103 कोटी, विशेष रस्ते दुरुस्तीसाठी 77 कोटी, रस्ते व पुलांचे कामांसाठी 72 कोटी, आणि पीएमआरडीएअंतर्गत 13 कोटींचा निधी उपलब्ध करुन खेड्यापाड्यातील रस्ते चकाचक केले आहेत. रायरेश्वर, तोरणा, व राजगड किल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी 15 कोटी मंजूर केले. धारांबे(रायरी) गावांतील शिवसृष्टीसाठी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हे काम प्रगतीपथावर आहे.
‘त्या’ कामांना लवकर यश येणार
भोर तालुक्यातील उत्रौली, वडगाव, भोर शहरातील भोरेश्वर औद्योगिक वसाहतीच्या जागेवर एमआयडीसी उभारण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व शेतकऱ्यांशी बैठका घेतल्या आहेत, लवकरच या कामांना यश येईल असा विश्वास आहे. मुळशी तालुक्यातील भरे येथे क्रीडा संकुलासाठी 1 कोटी मिळवले असून काम प्रतीपथावर आहे.
विविध क्षेत्रांतील आमदार थोपटेंचे योगदान
शैक्षणिक
राजगड ज्ञान पीठाचे विश्वस्त,
भोर-वेल्हे आणि पुरंदर तालुक्यात संस्थेची 23 विद्यालये,
चार कनिष्ठ महाविद्यालये
कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय
फार्मसी कॉलेज
अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालय
एमबीए इन्स्टिट्युट
25 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ.
सहकार
राजगड सहकारी साखर कारखाना अध्यक्ष,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक
दत्त दिगंबर वाहतूक संस्थेचे कार्याध्यक्ष
क्रीडा
कबड्डी, कुस्ती, फुटबॉल स्पर्धांचे आयोजन
अनंत स्पोर्टस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
भोर तालुका कुस्तीगीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
अनेक गावांत व्यायामाचे साहित्य वाटप