राज ठाकरेंच्या सभेसाठी अखेर सरस्वती विद्यामंदिराची जागा
नेत्यांच्या सभांसाठी जागांच्या शोधार्थ कार्यकर्त्यांची धावाधाव
पुणे – शहरातील कोणत्याही राजकीय पक्षाला सभेसाठी टिळक चौक (अलका टॉकिज चौक) देण्यात येणार नाही. लोकसभेसाठी तसेच 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या प्रचार सभेसाठी ज्या जागा देण्यात आल्या होत्या, त्याच जागा सभांसाठी देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी अलका टॉकिज चौकाची मागणी केली होती. मनसेच्या सभांसाठी शाळांची मैदाने उपलब्ध होत नाहीत. काही शाळांच्या प्रशासनाने सभेसाठी नकार दिला आहे. यामुळे सभा घ्यायची कोठे? हा प्रश्न मनसेपुढे पडला होता. सभेसाठी जागा न मिळाल्यास अलका टॉकिज चौकातच सभा घेणार, अशी भूमिका मनसेने नुकतीच घेतली होती. दरम्यान, मनसेला शुक्रवार पेठेतील सरस्वती विद्या मंदिराची जागा सभेसाठी उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी
6 वाजता ही सभा होणार आहे.
पुणे पोलिसांनी सन 2014 च्या विधानसभा प्रचार सभांसाठी दिलेल्या जागांची तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेसाठी दिलेल्या जागांची यादी तयार केली आहे. याच जागा सभांसाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही पक्षाला चौकातील जागा सभेसाठी दिली जाणार नाही. सर्व पक्षांसाठी नियम सारखाच असल्याचे सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने सभा घेण्याच्या जागेसाठी नियमावली तयार केली आहे.
त्यानुसार रस्त्यावर सभा घेता येत नाही. शहराच्या मध्यवर्ती परिसरात डेक्कन येथील नदीपात्रातील जागा अलका टॉकिज चौकाला पर्याय म्हणून वापरली जात होती. मात्र, येथे मेट्रो कामामुळे हा पर्याय बंद झाला आहे. यामुळे राजकीय पक्षांची सभांसाठी जागा शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे.