नवी दिल्ली : गुजरात दंगलग्रस्त बिल्कीस बानो यांना येत्या दोन आठवड्यात 50 लाखांची नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे.
2002 च्या दंगलीत त्या पाच महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्याची घटना घडली होती. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला हा आदेश 23 एप्रिल रोजीच दिला होता. पण राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली नव्हती.ही अंमलबजावणी का झाली नाही अशी विचारणा कोर्टाने आज गुजरात सरकारचे वकिल तुषार मेहता यांना केली. त्यावर आम्हीं या आदेशाच्या विरोधात अपिल करणार असल्याने आम्ही त्याची अंमलबजावणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने गुजरात सरकारची खरडपट्टी काढत बिल्कीस बानो यांना येत्या दोन आठवड्यात 50 लाखांची नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि त्यांना राहण्यासाठी घर देण्याची सुचना केली. तो आदेश पाळण्याचे लेखी आश्वासन गुजरात सरकारच्या वकिलांनी कोर्टाला दिले आहे.