राजगुरुनगर: खेड आळंदी विधानसभा मतदार संघात आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुचित्रा आमले यांनी दिली.
खेड आळंदी विधानसभा मतदार संघ निवडणुक प्रक्रिया सुरु झाली असून पहिला उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवार पांडुरंग महाराज शितोळे यांनी दाखल केला आहे. वारकरी सांप्रदायातील व्यक्तीने पहिल्यांदाच विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पांडुरंग नागोराव शितोळे रा आळंदी देवाची यांनी अपक्ष पदाचे दोन उमेदवारी अर्ज आज (दि.३०) रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. शितोळे महाराजां समवेत मोठ्या संख्येने आळंदी मधील कीर्तनकार, वारकरी आले होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पांडुरंग शितोळे यांनी सांगितले कि, राज्यात विविध मतदार संघात सर्व प्रकारचे उमेदवार दिले जात आहेत मात्र वारकरी पंथाचा आमदार होत नाही म्हणून आम्ही खेड-आळंदी मतदार संघ वारकऱ्यांसाठी सरकारने करावा अशी मागणी आहे. नुकत्याच आळंदी येथील वारकऱ्यांच्या बैठकीत वारकऱ्यांसाठी विधानसभेच्या निवडणुकीत राखीव जागा असावी. असा ठराव केला आहे. त्यातूनच आम्ही उमेदवारी दाखल केली आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान खेड आळंदी विधानसभा मतदार संघात आज अखेर एकूण १३ अर्ज वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी एका अपक्ष उमेदवाराने दोन उमेदवारी अर्ज सादर केले.