प्रकरणातील पोलिस अधिकारी निलंबित
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याची घटना समोर येत आहे. वाहनांची तपासणी सुरु असताना पोलिसांनी भाजपाचे कनापूरमधील विभागप्रमुख देवेंद्र राजपूत यांची दुचाकी थांबवून चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी राजपूत आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या पोलीस निरीक्षकाने राजपूत यांना मारहाण केली. या प्रकरणात निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, राजपूत यांना पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी पोलिसांना माझी ओळख सांगितल्यानंतरही त्यांनी मला थांबवल्याने वाद सुरु झाला, असे राजपूत यांनी सांगितले आहे. तर राजपूत यांच्याकडे कागपत्रांची मागणी केली त्यावरुन त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राजपूत आणि पोलीस अधिकारी धर्मेंद्र यादव यांच्यामधील शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत गेला. दोघे एकमेकांना मारु लागल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि रस्त्यावरुन जाणाऱ्यांना त्यांच्यामध्ये पडून वाद सोडवावा लागला. दरम्यान, धर्मेंद्र यांनी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांबद्दल अपशब्द वापरत माझ्या पतीला बेदम मारहाण केली, असा आरोप राजपूत यांची पत्नी संध्या यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक धर्मेंद्र यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे.