औषधे मुदतबाह्य होत असल्याने नव्याने खरेदी : “स्टॉक’ असूनही वापर न झाल्याने नुकसान
पिंपरी – महापालिकेकडे टेमिफॉस हे कीटकनाशक वगळता अन्य प्रमुख कीटकनाशक, जंतूनाशकांचा “बफर स्टॉक’ उपलब्ध आहे. तरीही मध्यवर्ती औषध भांडार विभागातर्फे सुमारे पावणेपाच लाख रुपयांच्या कीटकनाशकांच्या खरेदीचे पुरवठा आदेश दहा दिवसांपूर्वीच देण्यात आलेले आहेत. कीटकनाशके मुदतबाह्य होत असल्याने आवश्यकतेनुसार कीटकनाशकांची मागणी केली असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. शहरामध्ये डेंगी व मलेरियाच्या डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी व औष्णिक धुरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या कीटकनाशकांचा तुटवडा असल्याचे कारण देऊन क्षेत्रीय स्तरावर कीटकनाशक फवारणी, औष्णिक धुरीकरण, जंतूनाशक पावडर टाकली जात नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
आरोग्य विभागाच्या मागणीनुसार, डास अळीनाशक पायरोसीन ऑईल (150 लिटर), मलेरिया लार्वीसाईड ऑईल (300 लिटर), टेमिफॉस (100 लिटर) आणि डास प्रतिबंधक डेल्टामेथ्रीन केओथ्रीन 2.5 टक्के (100 लिटर) आदी कीटकनाशकांची मागणी आरोग्य विभागातर्फे मध्यवर्ती औषध भांडार विभागाला करण्यात आली होती. त्यानुसार 17 सप्टेंबरला पुरवठा आदेश देण्यात आलेले आहे. संबंधित कीटकनाशके महापालिका प्रशासनाला सोमवारपर्यंत (दि. 30) उपलब्ध होणार आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा
महापालिका रूग्णालयांमध्ये सध्या रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती औषध भांडार विभागाला संबंधित लस दर महिन्याला आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांचे प्रमाण सध्या वाढले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आठ रूग्णालयांमध्ये असे रूग्ण वाढले आहेत. या रूग्णांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी लागते. महापालिकेकडे सध्या 900 लस उपलब्ध आहेत. खासगी पुरवठादारांकडून महापालिकेला सध्या दरमहा एक हजार लस मागवावी लागत आहे. पुरवठादारांकडून आवश्यकतेनुसार रूग्णालयांना लस उपलब्ध करून देण्यासाठी भांडार विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. हाफकीन या संस्थेकडून रेबीज प्रतिबंधक लस बनविण्यात आल्यास त्यांच्याकडूनच संबंधित लस उपलब्ध करून घेण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे महापालिकेची गैरसोय दूर होणार आहे.
वापर का होत नाही ?
महापालिकेकडे प्रमुख कीटकनाशकांचा “बफर स्टॉक’ उपलब्ध असतानाही नव्याने कीटकनाशक खरेदी करण्याचे कारण उलगडत नाही. आरोग्य विभागातील सूत्रांनुसार कीटकनाशके जर मुदतबाह्य झाली, तर नव्याने मागणी नोंदवावी लागते. भांडार विभागाकडे कीटकनाशकांचा साठा उपलब्ध असल्यास त्यांनी त्याबाबत आरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. भांडार विभागातील सूत्रांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी “बफर स्टॉक’ करून ठेवावा लागतो. कीटकनाशके उपलब्ध असताना ती वेळेत वापरली न गेल्याने मुदतबाह्य ठरणार असतील तर संबंधित कीटकनाशके वेळेवर का वापरली जात नाही, असा प्रश्न मात्र यानिमित्ताने उपस्थित होतो.
महापालिका आरोग्य विभागाला लागणाऱ्या कीटकनाशकांची मागणी आवश्यकतेनुसार मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडे केली जाते. त्यानंतर भांडार विभागातर्फे खरेदी केली जाते.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी.
आरोग्य विभाग ज्याप्रमाणे मागणी करते, त्यानुसार त्यांना कीटकनाशकांचा पुरवठा केला जातो. आरोग्य विभागाच्या मागणीनुसार कीटकनाशक खरेदीसाठी आवश्यक प्रक्रिया झालेली आहे.
– मंगेश चितळे, सहाय्यक आयुक्त (भांडार
विभाग), महापालिका.