भाविकांमध्ये नाराजी : उद्यापासून नवरात्र महोत्सवास प्रारंभ
कार्ला – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला एकवीरा देवीच्या मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधा पुरविण्याकडे प्रशासकीय समितीचे दुर्लक्ष होत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करीत आहेत.
गेल्या वर्षभरापासून कार्ला एकवीरा देवी मंदिरातील ट्रस्टचा कारभार प्रशासकीय समितीच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र समिती सदस्यांकडून देवस्थानच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने देवस्थानची दुरवस्था झाली आहे. वर्षभरापासून गडावर पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. स्वच्छतागृह अभावी भाविक व पर्यटकांची विशेषतः महिला पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील अस्वच्छता व कचऱ्याचे ढीग स्वच्छतेला हरताळ फासणारे आहेत. गडाप्रमाणेत पायऱ्या व पार्किंगच्या जागेत जागोजागी कचरा व पिशव्या पहायला मिळतात. पायऱ्यांवरील वीज अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्री व पहाटे भाविकांना अंधारात पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागत आहेत.
नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होत असताना गडावर उत्सवाची कसलीही तयार झालेली नसल्याने देवीच्या नवरात्र उत्सवावर प्रशासकीय उदासिनतेचे ढग पहायला मिळत आहेत.