राष्ट्रवादी देखील नवीन चेहऱ्याच्या शोधात । नेत्यांनी केली काही जणांबरोबर चर्चा
नगर – राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असतांनाही आमदार अरूण जगताप व त्यांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप यांनी त्याबद्दल कोणतीही क्रिया – प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्याचा अर्थात अजूनही आमदार जगताप पिता-पुत्रांना राष्ट्रवादीचे वावटे असल्याचे दिसून येत आहे. आ. संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीतच राहणार असून मीच पक्षाचा उमेदवार असल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात मात्र कृती वेगळीच होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नवा चेहरा शोधण्यास सुरवात केली असून बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी शहरातील काही मान्यवरांशी गुप्तपणे चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आ. संग्राम जगताप यांनी उसंत न घेता जोरदार प्रचार केला. त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवार देखील गॅसवर ठेवला होता. शेवटच्या क्षणापर्यंत आ. जगताप यांनी चांगल्या पद्धतीने लढत दिली होती. पण निकाल जाहीर झाल्यानंतर आ.जगताप यांनी पराभव देखील पचवला. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणेच बदलली. लोकसभेला शिवसेना व भाजप युतीला मिळालेल्या यशामुळे पुन्हा राज्यातही युतीची सत्ता येणार असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरू झालेली पडझड अद्यापही थांबली नाही.
जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे तीनही आमदार युतीच्या संपर्क असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यात अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आ. संग्राम जगताप व श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्याही प्रवेशाची चर्चा होती. परंतु खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आ. संग्राम जगताप कोठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही दिवस या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पण त्यानंतर पुन्हा आ. संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली.
आ. जगताप यांच्या या शिवसेना प्रवेशाला नगर शहरातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवून येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यात दरम्यान, शिवसेनेतील काही इच्छुकांनी देखील ठाकरे यांची भेट घेवून राठोड यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे पुन्हा शिवसेना प्रवेशाची चर्चा देखील थांबली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी पत्रकार परिषदे घेवून आ. जगताप यांच्याबद्दल सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला अर्थ नसल्याचे स्पष्ट करून ते राष्ट्रवादीतच राहणार असून ते पक्षाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले होते. त्याबरोबर आ. जगताप यांनी देखील पक्षांतराच्या विषयाला नसल्याचे स्पष्ट केले. अर्थात एवढे स्पष्टीकरण देवून देखील आमदार जगताप पिता-पुत्रांकडून कृती मात्र वेगळीच होतांना दिसत आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर शहरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार पिता-पुत्रांनी हजेरी लावली. परंतु शहरात पक्षाचा मेळावा असतांना पाहिजे तेवढा त्यांचा सहभाग दिसून आला नाही. शहरातील पक्षातील कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी फारसे दिसले नाही. जिल्ह्याभरातून आलेले कार्यकर्ते आढळले. या मेळाव्याला त्यांनी निव्वळ उपस्थितीतच दाखविली.
त्याबरोबर पवारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध व्यक्त करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु आमदार जगतापांचे समर्थक किंवा स्वतः जगताप यांनी क्रिया किंवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावरून अजूनही आमदार जगताप पिता-पुत्र राष्ट्रवादीमय झालेले नाही. ते अद्यापही वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. दरम्यान, जगतापांच्या या हालचालींवर राष्ट्रवादीचे नेते लक्ष ठेवून असून पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी काल व आज सकाळी गुप्तपणे शहरातील काही मान्यवरांबरोबर चर्चा केल्याचे समजते. पक्षाकडून नवा चेहरा देण्याचा प्रयत्न असून त्या दृष्टीने या नेत्यांच्या गाठीभेटीला महत्व आले आहे.