पुणे – बोपदेव घाटात भर दुपारी तरुण-तरुणीला लुटणाऱ्या तिघांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)नुसार 5 वर्षे सकक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी हा आदेश दिला. कोल्हापुर परिक्षेत्रात मोक्क्याची झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. दंड न भरल्यास तिघांना अतिरिक्त 3 वर्षे कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
विशाल निवृत्ती लिंभोरे, प्रवीण रामंचद्र लिंभोरे आणि नीलेश शिवाजी लिंबोरे (रा. भिवरी, ता. पुरंदर) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत सागर शामराव डोळस (रा. हडपसर) याने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 28 जून 2014 रोजी घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे मोक्काचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. फिर्यादी मैत्रिणीला घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून चालला होता. बोपदेव घाटातील बोपदेव मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या आवारातील झाडाच्या कट्ट्यावर दोघे बसले होते. त्यावेळी तिघे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी आणि त्याच्या मैत्रिणीला धमकावत त्यांच्याकडील सोन्याची बाळी, चांदीची अंगठी, सोनाटा कंपनीचे घड्याळ घेतले. खांद्याला दगड मारून जखमी केले. त्यांनतर तिघे पसार झाले होते.