प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात राबविणार उपक्रम
पुणे – दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच रुग्णालयांमधील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्त, लस व औषधे वेळेत मिळावीत, यासाठी शासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अपघात व आपत्कालीन वेळेत रुग्णांपर्यंत औषधे, रक्त तातडीने मिळावीत, यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. शासनाने पुणे जिल्ह्यात हा उपक्रम राबविणयचा निर्णय घेतला आहे. यामुळे कमी वेळेत रुग्णांना औषधे मिळाल्याने त्यांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.
पुणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार हा मोठा आहे. जिल्ह्याचा काही भाग दुर्गम आहे. त्यामुळे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये औषधे मिळण्यास विलंब होतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना औषधोपचार मिळणे आवश्यक असते. मात्र ते मिळण्यासाठी बऱ्याचवेळा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना लांबचा प्रवास करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये त्वरीत औषधांची किंवा इतर गोष्टींची गरज भासते, अशा वेळेस ड्रोनद्वारे संबधित आरोग्य केंद्रांमध्ये वेळेवर औषधे पाठविता येणे शक्य आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग व झिपलाईन या कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीस या उपक्रमासाठी योग्य ते सहकार्य जिल्हा स्तरावरील रुग्णालयांनी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या उपक्रमाला दोन वर्षासाठी व प्रायोगित तत्वावर शासनाने परवानगी दिली आहे. या उपक्रमासाठी या कंपनीस शासनाकडून कोणताही निधी दिला जाणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.