जीवनगाणे : देवाशी संवाद साधा

अरुण गोखले

तुम्हाला जर एखाद्या माणसाने असे विचारले की काय हो, तुम्ही देवाशी संवाद करता का? तर मला वाटते की एकतर आपण त्या माणसाला वेड्यात तरी काढू किंवा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू. पण खरं सांगू का? त्याचा तो प्रश्‍न हा अगदी योग्य आहे. खरं म्हणजे आपण प्रत्येकानेच असा देवसंवाद साधायला हवा.

देवांनी ज्यावेळी ही सारी सृष्टी निर्माण केली त्याबरोबरच त्याने माणूसही निर्माण केला आपल्यासारखाच, आपलंच प्रतिबिंब म्हणून. देवाने उदार अंत:करणाने माणसाला वाचेचेही एक अमूल्य वरदान दिले. कां तर या जीवाने जीवनातल्या अनुभव प्रचितीचा आपल्याशी सुखसंवाद साधावा म्हणून. पण माणूस मात्र त्या दात्याला विसरला. तो देवाशी नाही तर जगाशी संवाद साधू लागला. त्याला जे हवं ते तो इतरांकडे मागू लागला. कुणी त्याच्या मागण्या पुरवू लागले. तर कोणी त्याच्या मागण्या नाकारू आणि झिडकारू लागले. त्यामधून माणसाला त्याच्या जीवनात सुख-दु:ख, लाभ हानी, प्राप्ती-अप्राप्ती याचा अनुभव येऊ लागला. कधी तो सुखावू लागला, तर कधी दु:खी कष्टी होऊ लागला. ज्याच्याशी संवाद साधायला हवा त्यालाच तो विसरला.

खरं म्हणजे आपण देवाची जी प्रार्थना करतो ना तो एक प्रकारचा संवादच असतो. पण तो कसा असायला हवा तर आपण आपल्या आईशी जसं लडिवाळपणे बोलतो, तिच्याकडे कसं हवं नको ते मागतो तसं आपण प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला सांगायला हवे. आपल्याला काय हवयं, ते त्याला सांगाव,ं मागू नये. आई जसं मुलाला केव्हा कसं अन्‌ किती द्यायचं ते ठरवीत असते. तशीच ती विश्‍वाची माऊली म्हणजेच देव तुम्हाला केव्हा किती आणि काय द्यायचं ते ठरवत असतो.
आपल्या प्रार्थनेत विनंती हवी, आर्जव हवा.

त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे कृतज्ञतापूर्वक आभार मानायला हवेत. देवाशी सुखसंवाद कसा साधावा हे आपल्याला संत शिकवतात. ते सांगतात की तू तुझं सारं सुख दु:ख त्याला सांग. तुझा संसार प्रपंच्याचा भार त्याच्या पायावर घाल. तू असा संवाद साधत गेलास ना की आपोआप तुझ्या मनावरचा ताण दूर होईल, तुझं मन मोकळ होईल. कोणीतरी तुझ्या पाठीशी आहे हा विश्‍वास तुला जीवनात खूप उपयोगी पडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.