ट्रॅक्टरवर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात मागितली होती दहा हजारांची लाच
नगर (प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर चहाच्या टपरीत ट्रॅक्टरवर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
राहाता पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब गोपीनाथ बाचकर (वय-32,रा. सदगुरू अपार्टमेंट) असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रादार यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच पोलीस बाचकर यांनी मागितली होती. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक करांडे, तन्वीर शेख, रमेश चौधरी यांच्या पथकाने सापळा रचवून राहाता तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाजवळील चहाच्या टपरीत जवळ चार हजार स्विकारतांना बाचकर याला लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले