पिंपरी – दहा दिवसांपासून विराजित असलेल्या गणरायाला भाविक गुरुवारी निरोप देणार आहेत. शहरात विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. विसर्जन मिरवणुकीची आवश्यक पूर्वतयारी महापालिकेने पूर्ण केली आहे. शहरातील एकूण 26 घाटांवर गणेश विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागातर्फे सर्व विसर्जन घाटांची स्वच्छता केली जात आहे. त्याशिवाय, हौदांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. नदी प्रदूषण टाळण्यासाठी घाटांवर निर्माल्य कुंडांची व्यवस्था केलेली आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
महापालिकेतर्फे पिंपरी येथील कराची चौक, चापेकर चौक (चिंचवडगाव) येथे पोलीस मदतकक्ष उभारण्यात येत आहे. तर, भोसरी येथील पीएमटी चौकात महापालिकेतर्फे पोलीस मदतकक्ष उभारला आहे. या प्रमुख तीन ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची सोय केलेली आहे. घाटांवर लाइफ जॅकेट, दोर, गळ आदी सुरक्षा साधने ठेवली आहेत. तसेच, प्रत्येकी 2 सुरक्षारक्षक, 1 जीवरक्षक, 4 अग्निशामक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तैनात केले आहेत. त्याशिवाय, प्रत्येक घाटावर दोन ते तीन निर्माल्य कुंड ठेवण्यात आले आहेत. सर्व विसर्जन घाटांवर आवश्यकतेनुसार पुरेशी विद्युत व ध्वनिक्षेपण व्यवस्था केलेली आहे. तसेच, आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घाटांवर आवश्यकतेनुसार वैद्यकीय पथक आणि ऍम्ब्युलन्सची सोय असणार आहे.
काही प्रमुख घाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. चिंचवडगाव-थेरगाव पुल घाट येथे नदीपात्रामध्ये दोर बांधण्यात आला आहे. तसेच, येथील घाटावर असलेल्या हौदात घरगुती गणपतींचे विसर्जन आणि मूर्तीदान उपक्रम राबविला जात आहे. सर्वच घाटांवर सुरक्षारक्षक, जीवरक्षक, अग्निशामक, आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पिंपरी येथील झुलेलाल घाटावर असलेल्या हौदातही गणेश विसर्जनाची सोय आहे. यावेळी भाविकांनी बाप्पांचे हौदात विसर्जन करावे, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, जीवरक्षक, अग्निशामक आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. पिंपरीगाव येथील काशीबा शिंदे घाट आणि वैभवनगर येथे विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.