पिंपरी – राहत्या घरात पेटवून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा मृत्यू झाला. त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी रुपीनगर येथे घडली.
शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ठवाळ यांच्या घरातून धूर येताना घराशेजारच्या लोकांना दिसला. आसपासच्या नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शीतल यांना त्वरीत वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शीतल जिल्हा परिषदेमध्ये नौकरीला होत्या. त्या सात महिन्यांच्या गरोदर असल्याने रजेवर होत्या. त्यांचे पती काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. ठवाळ यांच्या घरात नातेवाईक महिला बाळांतीन झाल्याने त्यांना शेक देण्यासाठी कोळसा आणि रॉकेल आणले होते. ते रॉकेल अंगावर ओतून घेत शीतल यांनी पेटवून घेतले होते. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असे सांगितले जात असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.