जिल्हा नियोजन समितीची सभा; दि. 28 सप्टेंबरपर्यंत घरोघरी माहिती देणार
सातारा – सातारा जिल्ह्यात शुक्रवार, दि. 13 पासून कुष्ठरोग, क्षयरोग, व असांसर्गिक रोग प्रतिबंध जागरूकता आणि रुग्णशोध अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत दि. 28 सप्टेंबरपर्यंत घरोघरी जाऊन माहिती देण्यात येणार आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा नुकतीच झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सचिन पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, उपाध्यक्ष समाधान पोफळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, शिक्षणाधिकारी, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, रेडक्रॉस सोसायटीचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते .
या अभियानात दि. 13 ते 28 सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील 30 टक्के लोकसंख्येमध्ये आशा स्वंयंसेविका व पुरुष स्वयंसेवकांमार्फत तपासणी करून संशयित कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण व असंसर्गजन्य रुग्ण शोधण्यात येणार आहेत.
त्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन सिंघल यांनी केले आहे. वजन वाजवीपेक्षा जास्त असल्यास, दारू अथवा तंबाखूचे नियमित सेवन करत असल्यास, कुटुंबात मधुमेह, उच्च रक्तदाब असल्यास, तोंडाचा कर्करोग असल्यास घरभेटीस येणाऱ्या पथकास नि:संकोचपणे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी अलकनंदा जाधव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पर्यवेक्षक महेश पिसाळ यांनी आभार मानले.