सहा महिन्यांत तिसऱ्यांदा व्याजदरात कपात
पुणे – भारतातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्जावरील व्याजदरात आणखी 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे.
नवे व्याजदर मंगळवारपासून लागू होणार आहेत. चालू आर्थिक वर्षात स्टेट बॅंकेने 3 वेळा आपल्या कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार, किरकोळ कर्जासाठी एमसीएलआर अगोदर 8.25 टक्के होता, तो आता 8.15 टक्के करण्यात आला आहे.
सोबतच बॅंकेने ठेवीवरील व्याजदरातही कपात केली आहे. किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदरात 0.20 ते 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. तर, मोठ्या ठेवीवरील व्याजदरातही 0.10 ते 0.20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. भांडवल सुलभतेत वाढ झाल्यामुळे हे व्याजदर कमी करण्यात आल्याचे स्टेट बॅंकेने सांगितले आहे.