कराड – गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी सोमवारी शहरात संचलन केले. सायंकाळी सहा वाजण्याचे सुमारास येथील शहर पोलीस ठाण्यात या संचलनाला सुरुवात झाली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, किशोर धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील शाहू चौक, दत्त चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक येथून कमानी मारूती मंदिर, कन्या शाळा मार्गे मंगळवार पेठेतील ज्योतिबा मंदिर, तेथून बुधवार पेठ मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, प्रभात टॉकीज, बापूजी साळुंखे पुतळ्यापासून पुढे बसस्थानक तेथून पुन्हा दत्त चौक, शाहू चौक मार्गे हे संचलन कराड शहर पोलीस ठाण्यात पोचले व तेथे त्याची समाप्ती झाली.
गणपती विसर्जनास सुरुवात झाली असून, पाचव्या व सातव्या दिवशीचे विसर्जन पार पडले आहे. गुरुवारी गणपती विसर्जनाचा मुख्य दिवस असल्याने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर होमगार्डची भरती देखील यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. शहरात उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.