नेरळे, मूळगाव पूल पाण्याखाली
पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अद्याप संततधार सुरुच आहे. बुधवारी पडणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणात होत असलेली पाण्याची आवक वाढल्याने कोयनेचे दरवा दहा फुट उचलून विसर्ग वाढविण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारीही पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्वर, कोयनानगर या ठिकाणी कमी-अधीक प्रमाणात पाऊस सुुरुच होता. मात्र जोर ओसरल्याने धरणाचे दरवाजे दहा फुटावरुन आठ फुटांवर करण्यात आले आहे. सध्या धरणात 55 हजार 580 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी 70 हजार 404 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे ऐन गणेश उत्सव काळात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडणारा पाऊस व कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे मोरगिरी विभागाला जोडणारा नेरळे पूल व मूळगाव पूल पाण्याखाली गेल्याने या विभागाचा पाटणशी जवळचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांचा पाटणच्या बाजारपेठेचा संबंध तुटल्याने ऐन सणासुदीच्या काळात गैरसोय निर्माण झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रासह तालुक्याच्या विविध भागात पावसाची संततधार अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसाने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या धरणात 55 हजार 580 पाण्याची आवक प्रतिसेकंद होत आहे. तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे आठ फुटांनी उचलून नदीपात्रात 70 हजार 404 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या बारा तासात कोयनानगर 109 मिलिमीटर, नवजा 171 मिलिमीटर, महाबळेश्वर 66 मिलिमीटर व वळवण 154 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणी पातळी 2162 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 103.62 टीएमसी झाला आहे.