शिरवळ-सुरुरदरम्यान प्रवाशाला लुटले

शिरवळ  – पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरवळ ते सुरूर दरम्यान पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रवास करत असताना एका प्रवाश्‍याला कारमधील अनोळखी तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व एटीएमद्वारे व्यवहार करून लुटमार करत तब्बल 38 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

अधिक माहिती अशी, विठ्ठल साहेबराव चव्हाण (वय 53, रा. सुरूर ता. वाई, सध्या रा. ठाणे) हे शिरवळ येथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी काम झाल्यानंतर शिरवळहून सुरूर याठिकाणी जात असताना आशियाई महामार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रवास करत असताना कारमधील अनोळखी तीन जणांनी विठ्ठल चव्हाण यांना दमदाटी करत चाकूचा धाक दाखवून मारहाण केली.

तसेच 6 हजार 550 रुपये रोख रक्कम, 30 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेतल्या व एटीएमचा पिन विचारून व्यवहार करून गाडीमध्ये विठ्ठल चव्हाण यांच्या डोळ्यावर पट्टी बांधत एका पेट्रोल पंपावर डिझेल भरत एका एटीएममधून आणखी रोख रक्कम काढत लुटमार करत तब्बल 38 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यावेळी संबंधितांनी दमदाटी करत व मारहाण करत वेळे (ता. वाई) गावाच्या काही अंतरावर गाडीमधून ढकलून देत पलायन केले. या घटनेची फिर्याद विठ्ठल चव्हाण यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ हे करीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.